Raj Thackeray: जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी करुन दाखवेल - राज ठाकरे
Subodh Bhave with Raj Thackeray : अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. हर हर महादेव सिनेमात राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे.
मुंबई : हर हर महादेव सिनेमाच्या निमित्ताने राज ठाकरे यांची सुबोध भावे याने मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखतीत बोलताना अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. शिवरायांच्या काळात असते तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं असं विचारलं असता, मला शिवाजी महाराजांचा घोडा ही व्हायला आवडलं असतं. असं ते म्हणाले. 'मला आजही वाटतं आपण त्या काळात असायला हवं होतं. महाराजांचा स्पर्श व्हायला हवा होता.'
छत्रपती शिवरायांकडे काय मागाल ?
'महाराष्ट्राच्या सर्वांना सदबुद्धी दे. सर्वांना छत्रपती समजू देत. हे समजलं ना की सगळं ताळ्यावर येईल. विलासराव देशमुख मुख्यंमत्री होते तेव्हा समुद्रात महाराजांचा पुतळा उभं करण्याचा विषय सुरु होता. मी तेव्हा ही म्हटलं होतं यावर खर्च करण्याऐवजी गडकिल्ल्यांवर खर्च करा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रेंचने अमेरिकेला भेट दिला होता. आता शिवाजी महाराजांचा इतका मोठा पुतळा उभं करणं म्हणजे किती मोठा घोडा उभा करावा लागेल. समुद्रातील पुतळा कधी हालला तर काय करायचं. 10-12 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. तोच गडकिल्ल्यांवर खर्च केला तर सर्व इतिहास जिंवत होईल.'
'शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हवे तितके चांगले नाहीत. इतिहास उभं करण्याचं काम आपलं नव्हे. हे काम इंग्लंड- फ्रेंचला द्या. त्यांना सांगा असा आमचा इतिहास आहे. त्यांना सोपवा ते सगळा इतिहास तपासतील. सगळं डिटेल मध्ये उभं करतील. आता लोकं म्हणतील देश म्हणून काही आहे की नाही. पण जे आहे ते आहे.'
हर हर महादेव सिनेमा पाहण्याचं आवाहन
'सर्व जनतेला विनंती आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी जनतेला ही आवाहन आहे. अत्यंत कष्ट घेऊन हा चित्रपट बनवला आहे. झी पासून सगळे सहकारी यात होते. सगळ्यांनी हा सिनेमा नक्कीच पाहिला पाहिजे. असं ही राज ठाकरे म्हणाले.
शिवाजी महाराजांपुढे काय शपथ घ्याल?
राज ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, मी माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला बोललो होतो. हे राज्य माझा हातात आलं तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी करुन दाखवेल.
नातवाला महाराजांची कोणती गोष्ट सांगाल?
'तो मुलगा असल्याने आणि ठाकरे असल्याने त्याला लढाया सांगाव्या लागतील असं मला वाटतंय. शिवरायांचा संस्कार पुढे चालणं हे देखील महत्त्वाचं वाटतं.' असं राज ठाकरे म्हणाले.