मुंबईतल्या टोळधाडीचे काय आहे व्हायरल वास्तव?
मुंबईतल्या काही भागात टोळधाड आल्याचा मेसेज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता.
मुंबई : मुंबईतल्या काही भागात टोळधाड आल्याचा मेसेज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. आफ्रिकेत उपद्रव करणारे टोळ भारतातील काही राज्यात गेले काही दिवस पिकं आणि झाडांचे नुकसान करत आहेत. गुरूवारी ते मुंबईत दाखल झाल्याचे मेसेज व्हायरल झाल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती.
टोळधाडीबाबत मुंबई महापालिकेचा खुलासा
मुंबईत टोळधाड आल्याच्या व्हायरल मेसेजमध्ये खिडक्या बंद ठेवा, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मुंबईकरांमध्ये याबाबत चर्चा सुरु झाल्यामुळे मुंबई महापालिकेने याबाबत खुलासा केला आहे. टोळधाड मुंबईत आलेली नाही आणि टोळधाडीपासून मुंबईला कोणताही धोका नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई आपत्कालिन कक्षाकडे अशी कोणतीही सूचना आलेली नाही. हवामान विभाग, कृषि विभाग यांच्याशी चर्चा झाली असून मुंबईला असा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे, असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
काय आहे टोळधाड?
जगभरात वेगवेगळ्या भागात आढळणारे आणि विशेषतः आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात उपद्रव करणारे टोळ (Locust) कोट्यवधींच्या संख्येत येतात. दिसायला आकर्षक असलेले हे टोळ शेती आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. सध्या टोळधाडीचं हे संकट भारतात वेगवेगळ्या राज्यात घोंगावत आहे.
भारतात कुठून आली टोळधाड?
सध्या भारतात आलेली टोळधाड पाकिस्तान मार्गे आली आहे. पाकिस्तानातून घुसखोरी केलेले हे टोळ भारतात हनीमून ट्रिपवर आल्याचं म्हटलं जातं. पाकिस्तान ही टोळधाड रोखू शकला नाही. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान करून हे टोळ भारतात घुसले आहेत. अनेक देशांना या टोळधाडीने हैराण करून सोडले आहे.
भारतात कोणत्या राज्यात टोळधाडीचे संकट?
भारतातली काही राज्ये सध्या या टोळधाडीशी झुंजत आहेत. गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांची टोळधाडीने डोकेदुखी वाढली आहे. तर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्याला या टोळधाडीचा धोका आहे. महाराष्ट्रात नागपूर, वर्धा आणि अमरावतीमध्ये टोळधाडीचं संकट ओढवलं असून तिथले शेतकरी त्रस्त आहेत. हे टोळ जिथे जातात, तेथील पीक ते नष्ट करतात.
टोळधाडीने किती नुकसान?
हे टोळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान टोळधाडीवर नियंत्रण ठेवू शकलं नसल्याने ते भारतात घुसून पीकं नष्ट करत आहेत. असे टोळ जगभरातली १/५ जमीन व्यापू शकतात आणि जगातल्या १/१० लोकांची रोजी-रोटी हिरावू शकतात. जगभरातल्या ६० देशांना या टोळधाडीचा फटका बसतो. ही टोळधाड आफ्रिका, आखातातून पुढे भारतात येते.
टोळधाड भारतात का येते?
जोधपूरच्या टोळधाड नियंत्रण संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात मॉन्सूनच्या आधी प्रजननासाठी टोळ भारतात येतात. भारतातून मग ही टोळधाड आखात, इराण, आफ्रिकेकडे परत जाते. यावेळीही भारत-पाकिस्तान सीमेजवळ मोठ्या प्रमाणात टोळ आहेत. हे टोळ भारतात मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. असं म्हटलं जातं, हे टोळ भारतात हनीमूनला येतात, त्यांची संख्या वाढवतात आणि पीक नष्ट करतात.
टोळांची झुंड आणि प्रजनन
टोळधाड रोखण्यासाठी काम करणाऱ्या जोधपूरच्या संघटनेच्या म्हणण्यानुसार हे टोळ झुंडीनेच येतात. मेटिंगनंतर दोन दिवसांनी अंड देतात. केवळ पिवळे टोळ अंडी देतात. गुलाबी टोळ अंडी देत नाहीत. मादी शेपूट जमिनीत सहा इंच खाली घुसवून अंडं देतं. अंडी देताना हे टोळ एकाच ठिकाणी तीन-चार दिवस थांबतात. यावेळी शेतात नांगर फिरवून अंडी नष्ट केली जाऊ शकतात.
अंडी दिल्यानंतर १२ दिवसांनी टोळ दिसू लागतात, पण ३० दिवसांनी त्यांची पूर्ण वाढ होते. दिनभर ते उडतात आणि संध्याकाळ झाली की झाडांवर पिकांवर बसतात. रात्रभर ते तिथेच बसून राहतात आणि सकाळी सूर्योदय होताच ते पुन्हा उडू लागतात. ते तिथे जातात, तिथे पूर्ण पीक नष्ट करतात.
टोळधाड रोखायची कशी?
कृषि वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार, यांना शेतात येण्यापासून रोखायचे असेल तर डीजे लावावा किंवा ढोल, ड्रम, थाळीचा आवाज केल्यास ते पळून जातात. ढोल, थाळीचा आवाज त्यांना पसंत नसतो. त्यांना मारण्यासाठी मालाथियान, क्लोरोपाइरीफास, डेल्टामेथरिन या किटकनाशकांची फवारणी केली जाते. राजस्थानच्या कृषि विभागामार्फत फायर ब्रिगेडच्या ट्रकमध्ये औषध टाकून ठिकठिकाणी फवारणी केली जाते. ड्रोननेही फवारणी केली जाऊ शकते. त्यासाठी नागरी हवाई उड्डयन विभागाची मदत घेतली जात आहे.