नशीबाने सत्ता मिळालेल्या काँग्रेसमधील मंत्र्यांचे नाराजी नाट्य दीड वर्षांनीही संपेना
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही नाराजी कायम
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात नशीबाने सत्ता मिळालेल्या काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाच्या पदासांठीची महत्त्वाकांक्षा संपताना दिसत नाही. मंत्रीपद मिळाले तेव्हाही काही नेत्यांची महत्त्वाच्या खात्यांसाठी चाललेली धडपड दिसली तर आता दीड वर्षानंतरही मिळालेल्या मंत्रीपदावर समाधानी नसल्याचं विजय वड्डेटीवार यांच्या विधानावरून दिसून आले. वडेट्टीवारांची ही नाराजी अनेकदा समोर आलेली आहे.
ओबीसी असल्याने आपल्याला महसूल खातं मिळालं नसल्याचं विधान विजय वड्डेटीवार यांनी लोणावळ्यातील ओबीसी शिबिरात केलं. विजय वड्डेटीवार यांच्याकडे ओबीसी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, मदत व पुनर्वसन ही खाती आहेत. मात्र मंत्रीपद मिळाल्यापासून वड्डेटीवारांचं हे नाराजी नाट्य सुरू आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वड्डेटीवारांकडे मदत व पुनर्वसन ऐवजी भूकंप पुनर्वसन हे खातं देण्यात आलं होतं. त्यामुळे नाराज असलेल्या चार दिवस वड्डेटीवारांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला नव्हता. त्यानंतर भूकंप पुनर्वसन ऐवजी मदत व पुनर्वसन खातं दिल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. सत्ता स्थापन झाल्यापासून काँग्रेस नेत्यांचं सुरू असलेलं हे नाराजी नाट्य अजूनही सुरूच आहे. आधी महत्त्वाच्या खात्यासाठी नाराजी, खातं मिळाल्यानंतर अति महत्त्वाच्या खात्यासाठी नाराजी, आपल्या खात्याला अधिकार नाहीत म्हणून नाराजी, काँग्रेसची काम होत नाहीत म्हणून नाराजी. अशी काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजीची साखळी संपताना दिसत नाही.
विजय वड्डेटीवार यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं सांगत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे त्यांचं वय पाहता भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते असा सबुरीचा सल्लाही दिलाय.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार पक्ष सोडून भाजपत गेले होते. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २० जागाही मिळणार नाहीत, अशी चर्चा होती. काँग्रेसलाही तसंच वाटत होतं. पण काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. एवढंच नाही तर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने काँग्रेसला सत्तेत वाटाही मिळाला. अशा स्थितीत मिळालेल्या सत्तेत समाधान मानतील ते काँग्रेसचे नेते कसले.