मुंबई: श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कालपासून ट्विटर वॉर सुरु आहे. या शाब्दिक लढाईत आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पुन्हा टोला लगावला आहे. तुम्ही महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेला आहात, हे विसरु नका, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला. तसेच १४ मे रोजी रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या नागपुर-उधमपूर ट्रेनच्या विलंबावरूनही राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना लक्ष्य केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार म्हणते यादी पाठवली, पियुष गोयल म्हणतात मिळालीच नाही

नागपुर - ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? मग आता यादी कसली मागताय?, असा सवाल राऊत यांनी गोयल यांना विचारला आहे. 
१४ मे रोजी चालवण्यात आलेली नागपुर- उधमपूर ट्रेन तब्बल नऊ तास उशीरा आली होती. त्यामुळे या ट्रेनला उधमपूरमध्ये जाण्यासही विलंब लागला होता. या सगळ्यामुळे ट्रेन सुटण्याच्या वेळेत स्टेशनवर आलेल्या मजुरांची मोठी गैरसोय झाली होती.



दरम्यान, संजय राऊत यांनी कालही पियुष गोयल यांच्यावर बोचरी टीका केली होती. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.