दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : निवडणूक रणनितीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीकडे पाहिलं जात आहे. प्रशांत किशोर पहिल्यांदा चर्चेत आले ते २०१४ साली. २०१४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे रणनितीकार म्हणून काम केले होते. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोठं यश मिळवलं. या यशाचा चेहरा ममता बॅनर्जी होत्या. मात्र त्यामागे प्रशांत किशोर यांची रणनीती होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी आणि शहा यांच्याविरोधात योग्य रणनीती आखली तर त्यांचा पराभव केला जाऊ शकतो हा आत्मविश्वास प्रशांत किशोर यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीने दिला. त्यामुळेच आता प्रशांत किशोर देशभर भाजप विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. आज शरद पवारांबरोबर त्यांची झालेली भेट याचाच भाग असल्याचं बोललं जातंय. 


प्रशांत किशोर सकाळी ११ वाजता शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले आणि दुपारी २ वाजता ते तिथून बाहेर पडले. म्हणजे तब्बल तीन तास या दोघांमध्ये राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. एकीकडे देशात काँग्रेस पक्ष कमजोर होत चाललाय त्यामुळे भाजपला टक्कर द्यायची असेल तर सर्व राज्यातील भाजप विरोधी पक्षांना एकत्र येणे महत्त्वाचा आहे. 


शरद पवार यांचे देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे या सर्व पक्षांना भाजपा विरोधात उभं करायचं असेल तर शरद पवार हा हुकमी एक्का आहे, याची कल्पना प्रशांत किशोर यांना आहे. त्यादृष्टीनेच प्रशांत किशोर यांनी आज शरद पवारांची भेट घेऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीची दृष्टीने भाजप विरोधात आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा आहे. 


प्रशांत किशोर यांनी यापूर्वी भाजपा बरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे निवडणूक रणनितीकार म्हणूनही काम केले आहे. 


देशभरातील विविध राजकीय पक्षांबरोबर काम करण्याचा अनुभव आणि निवडणूक रणनीती या दोन्ही गोष्टी लक्षात घेता शरद पवार यांना पुढे करून देशात भाजप विरोधात आघाडी उभी करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच शरद पवारांवर त्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जाते. 


याशिवाय पुढील वर्षी २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात देशात ४ राज्यांची विधानसभा निवडणूक होत आहे. त्यात उत्तर प्रदेश सारखे महत्त्वाचे राज्य असून पंजाब, उत्तराखंड, गोवा या राज्यांचा समावेश आहे. 


या राज्यातही भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणून भाजपविरोधात लढा दिला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या भेटीत त्याबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. 



राज्याच्या आणि देशाचे राजकारण सध्या भेटीगाठीने ढवळून निघालंय. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीने जी चर्चा सुरू झाली होती त्याला खुद्द शरद पवार यांनी पूर्णविराम दिला. तर आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या भेटीने राजकारणात नवी चर्चा सुुरू झाली आहे ही भेट देशाच्या राजकारणाला नवी दिशाा देणार का ते पहावं लागेल.