शरद पवार आणि राज्यपालांच्या भेटीत काय घडले, प्रफुल्ल पटेल म्हणाले...
शरद पवार आणि राज्यपाल यांची अचानक भेट...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार सोमवारी सकाळी अचानक राज्यपालांच्या भेटीला गेले होते. शरद पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेलही राज्यपालांच्या भेटीसाठी उपस्थित होते. शरद पवार आणि राज्यपाल यांच्या अचानक भेटीमुळे, यांच्यात नक्की काय चर्चा झाली याकडे सर्वाचंच लक्ष होतं. मात्र शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट ही सदिच्छा भेट असून या भेटीदरम्यान कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
त्याशिवाय प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वे मंत्रालयाबाबत बोलताना रेल्वे मंत्रालयाचं कौतुक करायला केलं पाहिजे, असंदेखील ते म्हणाले. रेल्वे मंत्रालयावर इतका भार असूनही त्यांच्याकडून चांगलं काम सुरु आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
कोरोना संकटाच्या काळात गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. भाजपकडून नुकतंच 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनही करण्यात आलं होतं. तसंच कालपासून श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या राजकारणात शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत होती. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगत वर चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.