राणे विरूद्ध शिवसेना संघर्षाला नवी धार, राणेंची जुनी प्रकरणं राज्य सरकार खोदणार?
धूळ बसलेल्या अनेक फाईली बाहेर येणार आणि महाराष्ट्रात नवा संघर्ष पेटणार की काय अशी शक्य़ता आहे
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राला ठाकरे आणि राणे संघर्ष तसा नवा नाही. आरोप प्रत्यारोप आणि जहरी टीकेपर्यंत असलेल्या या युद्धानं आता नवं रूप धारण केलं आहे. या दोघांमधला सामना आणि एकमेकांवरील प्रहार आता थेट कोर्ट कचेऱ्यांमध्ये रंगणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) अटकनाट्यामुळे शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणेंच्या संघर्षानं नवं वळण घेतलं आहे. आतापर्यंत भाषणांमधून टीका आणि रस्त्यावरचा राडा एवढ्यापुरती मर्यादित असलेली लढाई आता कोर्ट कचेऱ्यांमध्ये पोहोचली आहे. सामनातल्या अग्रलेखात याची झलक बघायला मिळाली.
सामनातून काय टीका करण्यात आली?
‘नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरुन उठवणं वाईटच. पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भर संसारातून कायमचे कोणी उठवले? या प्रकरणांचा नव्याने तपास ठाकरे सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारुन पडण्याइतके सोपे नाही.’
नितेश राणे यांचा इशारा
सामनाच्या अग्रलेखाला उत्तर देत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेच्या एका युवा मंत्र्यावर निशाणा साधलाय. नंदकिशोर चतुर्वेदी हे गृहस्थ कोण आहेत?, काही महिन्यांपासून ते का गायब आहेत?, कोणाचे फायनान्स सांभाळत होते? आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या एका युवा मंत्र्याचे ते पार्टनर म्हणून होते, मग असे महाराष्ट्रातून लोकं गायब होत असतील, त्यांचा थांगपत्ता पण लागत नसेल तर याची पण चौकशी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या सरकारकडून केली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
'अंगावर याल तर ही शिवसेना आहे'
कायद्यानं धडा शिकवण्याची भाषा सुरू असतानाच संजय राऊत यांनी राणेंना गर्भित इशाराही दिला आहे. 'तुम्ही केंद्रातील मंत्री आहात. आधी देश समजून घ्या. जे काम आहे ते करा. राज्यात येवून बकाल आणि बकवास बोलू नका. त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. अंगावर याल तर ही शिवसेना आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणे यांना इशारा दिला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे आणि केंद्रात भाजपचं. दोन्ही बाजूंनी आपापल्या यंत्रणा वापरून कारवायांचं सत्र सुरू होऊ शकतं. त्यामुळे आता धूळ बसलेल्या अनेक फाईली बाहेर येणार आणि महाराष्ट्रात नवा संघर्ष पेटणार की काय अशी शक्य़ता आहे. मात्र राजकारणात एक वाक्य महत्त्वाचं 'जिनके घर शिशे के होते है, वो दुसरोंपर पत्थर नही फेका करते'.