मु्ंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षात केंद्रस्थानी असलेल्या खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी आणखी एक सूचक ट्विट केले आहे. राऊत यांनी आपल्या मनातली भावना व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा दुष्यंत कुमार यांच्या ओळींचा आधार घेतला आहे. तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं... कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं, अशा ओळी त्यांनी ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे राजकीय वर्तुळात राऊतांच्या या वक्तव्याचा मतितार्थ काय असावा, याची चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपकडून दगाफटक्याची शक्यता; शिवसेनेचे 'वाघ' पंचतारांकित पिंजऱ्यात राहणार


गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सकाळीच ट्विट आणि पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचा अजेंडा मांडताना दिसत आहेत. एकूणच आपण राजकारणाच्या केंद्रस्थानी राहू, हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न काहीप्रमाणात यशस्वीही ठरताना दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून माघार घेणार नाही, हे त्यांनी वारंवार ठणकावून सांगितले आहे.



दरम्यान, काल भाजपच्या कोअर कमिटीची निर्णायक बैठक पार पडली होती. यानंतर भाजपकडून शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. आज दुपारी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. त्यामुळे आज दिवसभरात अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.