मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी अचानक लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करायला कोण जाणार, हा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर आता या वाटाघाटींसाठी शिवसेना खासदार अनिल देसाई यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरही दिल्लीत उपस्थित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे संजय राऊत लीलावती रूग्णालयात दाखल


गेल्या काही दिवसांमध्ये भाजपविरुद्धच्या सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी शिवसेनेकडून अक्षरश: एकहाती किल्ला लढवला होता. दररोज ट्विट आणि पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत भाजपसमोर माघार घेणार नाही, असे वारंवार ठणकावून सांगितले होते. भाजपला शेवटपर्यंत राऊत यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देता आले नव्हते. त्यामुळे आता संजय राऊतच रुग्णालयात दाखल झाल्याने शिवसैनिकांची चिंता वाढली आहे. 



शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली; शिवसेनेकडून पाठिंब्याचा प्रस्ताव


प्राथमिक माहितीनुसार, राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वीही बॉम्बे रुग्णालयात त्यांची तपासणी झाली होती. राऊत यांच्यावर एंजिओग्राफी करण्याची गरज आहे का, याचा निर्णयही डॉक्टर लवकरच घेणार आहेत. दरम्यान, राऊत यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लीलावतीला जाणार असल्याचे कळते.