मुंबई : शिवसेना राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे लीलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत यांना लीलावतीच्या अकराव्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवस संजय राऊत हे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असणार आहेत. संजय राऊत यांना छातीत दुखत असल्याने त्यांना 2 दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे, आणि काळजी करण्याचं काहीही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टर जलील परकार ही संजय राऊत यांच्यावर ट्रीटमेंट करणार आहेत.
संजय राऊत हे मागील काही दिवसापासून शिवसेनेची भूमिका मांडत होते. मागील अनेक दिवसापासून ते आक्रमक भूमिका पार पाडत होते, या ताणतणावातच त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना, रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
संजय राऊत निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वांना उत्तरं देत होते. संजय राऊत यांनी दिल्लीत जावून सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली होती. एकूणच ताणतणावाचा हा परिणाम असू शकतो, पण संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची अॅन्जिओग्राफी करायची किंवा नाही याचा निर्णय तासाभरात होणार आहे.