`सामना`तील जाहिरातीनंतर नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक शिवसैनिकांच्या भूमिकेत बदल
`सामना`त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्याने प्रकल्पाच्या विरोधात असणारे नाणारवासीय संतप्त झाले आहेत.
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्यानंतर आता स्थानिक शिवसैनिकांच्या नाणार प्रकल्पाविषयीच्या भूमिकेतही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मैदानात उरतले आहेत. या समर्थकांनी आता नाणार रिफायनरी झालीच पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतली आहे.
यादृष्टीने पुढील रणनीती ठरवण्यासाठी राजापूरमध्ये नाणार प्रकल्पांच्या समर्थकांची एक बैठकही पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर हजर होते. जनतेची भूमिका ती माझी भूमिका असे म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रकल्प रद्द केला होता. पण, आता 'सामना'तील जाहिरातीमुळे सारे चित्रच पालटल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भविष्यात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
तर दुसरीकडे 'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्याने प्रकल्पाच्या विरोधात असणारे नाणारवासीय संतप्त झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी या लोकांना रत्नागिरीतील 'सामना'च्या कार्यालयावर धडक मोर्चाही काढला होता.
नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. 'रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच', असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे. नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासियांचे स्थलांतर थांबेल, असा दावा जाहिरातीमधून करण्यात आला होता.