मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तोंडभरून स्तुती केली होती. तसेच उदयनराजेंच्या प्रवेशामुळे भाजपला कसा मोठा फायदा होणार आहे, हेदेखील प्रसारमाध्यमांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. एकूणच भाजपकडून वारंवार उदयनराजेंचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने उदयनराजे भोसले यांच्याविषयी खोचक टिप्पणी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमित्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. याची कल्पना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटी यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल.


येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीवार्दाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.


याशिवाय, लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचीही शिवसेनेने आठवण करून दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भाजपविषयी भूमिका टोकाची होती. 'कोण मोदी? आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत', अशाप्रकारे उदयनराजेंनी मोदींचा एकेरी उल्लेख केल्याकडे शिवसेनेने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


उदयनराजे यांना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चि महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील, असे भाजपचे गणित आहे. पण शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणात मोहरे म्हणून वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.