आता बरेच आत्मे शांत झाले असतील; संजय राऊतांची खोचक टिप्पणी
केंद्रीय निवडणूक आयोगाने काहीवेळापूर्वीच राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले. आता राज्यातील बरेच आत्मे शांत झाले असतील, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने काहीवेळापूर्वीच राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी म्हटले की, आता बरेच आत्मे शांत झाले असतील. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यामुळे महाराष्ट्रात अनिश्चिततेचे वातावरण होते. ते आता थांबेल. मी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करतो, असे राऊत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; निवडणूक आयोगाची विधानपरिषद निवडणुकीला परवानगी
यापूर्वी महाविकासआघाडी सरकारने उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लावण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासाठी नकार दिला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी संजय राऊत यांचे वक्तव्य चांगलेच गाजले होते. राजभवन हा फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. त्यामुळे राज्यपाल आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते आणखीनच दुखावले गेल्याची चर्चा होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचे प्रकरण बराच काळ लांबले.
अखेर उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून या सर्व प्रकाराची कल्पना दिली. यानंतर दिल्लीतील सूत्रे वेगाने फिरली आणि अवघ्या दोन दिवसांत हा तिढा सुटला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेवर निवडून जाण्याचा मार्ग बिनधोक झाला आहे.