मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठीच्या निवडणुकीला परवानगी दिली. त्यामुळे आता यापैकी एका जागेवर निवडणूक लढवून उद्धव ठाकरे आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून जाऊ शकतात. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ मे पूर्वी या निवडणुका व्हाव्यात, असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असेल.
उद्धव-मोदींची 'मन की बात यशस्वी'? मिलिंद नार्वेकर राज्यपालांच्या भेटीला
आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली होती. तर काल शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा सुटेल, असे संकेत मिळत होते. अखेर ही शक्यता खरी ठरली.
Election Commission of India (ECI) grants permission for holding elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra. The necessary guidelines will need to be ensured for safety against #COVID19 during the elections pic.twitter.com/teikSwVdyi
— ANI (@ANI) May 1, 2020
यापूर्वी महाविकासआघाडी सरकारने उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लावण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासाठी नकार दिला. राज्यपाल नियुक्त सदस्यांची मुदत ही ५ जून रोजी संपत आहे. एवढय़ा अल्प वेळेसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची नियुक्ती करण्यास राज्यपालांनी नकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या माध्यमातून भाजप महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणू पाहत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला होता.