शिवसेनेच्या नादाला लागाल, तर आपल्या गोवऱ्या... संजय राऊत यांचा इशारा
`आम्ही महान योद्धे आहोत असा आव आणून अमरावतीचे बंटी-बबली मुंबई आले, पण...`
मुंबई : सत्ता असेल नसेल आम्हाला पर्वा नाही, तुमचा जीव तडफडतोय सत्तेशिवाय, स्वत:ची हिम्मत नाही पुढे येऊन लढण्याची म्हणून काही शिखंडींना पुढे करायचं आणि त्यांच्या आडून आमच्यावर हल्ले करायचे, त्या शिखंडीच्या आड अडून जे हल्ले करतायत, त्यांचा लक्षभेद केला जाईल, महाभारत नव्याने घडवण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
आम्ही अमरावतीत जाऊ, पाहू अमरावती कोणाचं आहे, यापुढे जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं, तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्णयावरुन माघार घेतल्यानंतर नागपूरमध्ये असलेल्या संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्य आणि भाजपवर घणाघात केला.
मुंबईसह महाराष्ट्रात संपूर्ण वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केला जात होता. मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसून हनुमान चालीसा वाचणं, अशा प्रकारची भाषा, नुसती वापरली नाही तर जणू काही आम्ही महान योद्धे आहोत, सत्यवादी आहोत, अशा प्रकारचा आव आणून अमरावतीचे बंटी आणि बबली मुंबईत आले.
त्यांनी थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधानांचा दौरा आहे मुंबईत, त्या दौऱ्याला गालबोट लागू नये या सबबी खाली त्यांनी पळ काढला, पंतप्रधानांच्या दौऱ्याची जबाबादारी ही राज्य सरकारची, महाराष्ट्राची तर आहेच, पंतप्रधान आमचे आहेत एका पक्षाचे नाहीत, पंतप्रधानांबद्दल आम्हाला तितकाच आदर आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये असं महाराष्ट्राला कधीच वाटणार नाही, आणि कोणी लावत असेल तर तिथे सरकार असो वा नसो शिवसेना तिथे ठामपणे उभी राहील पंतप्रधानांचं रक्षण करण्यासाठी, किंवा जे गालबोट लावू इच्छितात त्यांचा समाचार घेण्यासाठी, त्यामुळे आता हे काय बंटी आणि बबली गालबोट लागेल म्हणून आम्ही माघार घेत आहोत, असं म्हणत असतील तर त्यांचा दावा खोटा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ज्या संख्येने शिवसैनिक उतरले आहेत मुंबईत, मला कौतुक वाटतं आमच्या शिवसैनिकांचं, तिथे त्यांनी अॅम्ब्युलन्सही तयार ठेवल्या होत्या, बंटी आणि बबलीला अॅम्ब्युलन्समधून न्यावं लागलं तर. म्हणजे आमचे शिवसैनिक किती काळजी घेतात बघा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
भाजपची काही लोकं यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत. काल आणि आज मातोश्रीवर घुसून काही वेगळं करण्याचं कारस्थान यांनी रचलं होतं, हनुमान चालीसा वाचायचं असेल तर आपल्या घरातही वाचता येतं, मंदिरात वाचता येतं, अशा अनेक जागा आहेत. त्यासाठी मातोश्रीची जागा निवडणं महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करणं हे कोणाचं कारस्थान आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
या खासदार बाईंचं हिंदुत्वाशी संबंध काय आहे, श्रीरामाचं नाव घेण्याला यांचा विरोध होता, अयोध्या आंदोलनाला यांचा विरोध होता, हिंदुत्व शब्द घ्यायला यांना लाज वाटत होती, आणि आज हेच लोकं हनुमान चालीसा, हिंदुत्व अशी भाषा वापरुन महाराष्ट्रासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, शिवसेनेचं हिंदुत्व हे असं घंटाधारींचं नाहीए, आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही कायम हातात गदा घेतली आहे, तलवार घेतली आहे आणि गरज पडली तेव्हा अयोध्यात हातोडाही घेतला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
कृपा करुन शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका, मातोश्रीशी छेडछाड करु नका, २० फूट खाली गाडले जाल, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
राष्ट्रपती राजवट कधी आणि का लावली जाते हे आम्हाला माहित आहे, सकाळी चार वाजता राजभवन उघडून शपथ घेणारे, मग राष्ट्रपती राजवट उठवणारे कारस्थानी लोकं या महाराष्ट्राने पाहिलेलं आहेत. कायदा आणि घटना शिकवायची असेल तर राज्यपालांना शिकवा, अनेक घटनात्मक फाईलींवर ते अडीच वर्षांपासून बसून आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
जातीचं बोगस सर्टिफिकेट वापरुन लोकसभेची निवडणूक लढते आणि हायकोर्टानेही शिक्का मारलेला आहे की हे बोगस आहे. अशा बोगस सर्टिफिकेटवर निवडून आलेल्या खासदाराने आम्हाला नितिमत्तेच्या गोष्टी शिकवू नयेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
काल महाराष्ट्राची रेकी करण्याचा प्रयत्न झाला. आणि शिवसैनिक चिडले, चाल करुन गेले, तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसून आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.