मुंबईत महापालिकेत पुन्हा एकदा विराजमान होणार शिवसेनेचा महापौर
मुंबई महापालिकेत नवी राजकीय समीकरणं
मुंबई : मुंबई महापालिकेतही महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं नवी राजकीय समीकरणं आकाराला येत आहेत. शिवसेना आणि भाजपमधील मैत्रीत दुरावा आला असून, शिवसेना आणि काँग्रेसमधील अंतर कमी होत चाललं आहे. मुंबई महापालिकेत नवी समीकरणं जुळून येणार आहेत. शिवसेना आणि भाजप मैत्रीत दुरावा वाढला आहे. त्यामुळे २०२२ साठी भाजपचं शिवसेनेपुढे आव्हान असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी येत्या २२ नोव्हेंबरला होणारी निवडणूक फारशी चुरशीची होईल, असं वाटत नाही. शिवसेनेचा महापौर पुन्हा एकदा विराजमान होणार आहे. याची जाणीव असल्यानंच भाजप महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही. मात्र २०२२ मध्ये मुंबईत स्वबळावर भाजपचा महापौर निवडून आणण्याचा विडा भाजपनं उचलला आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र युती करणार नाही. मात्र २०२२ चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही भाजपचा असेल, असं ट्विट भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.
राज्यात महाशिवआघाडी आकारास येण्याची शक्यता असल्यानं मुंबई महापालिकेतही राजकीय समीकरणं वेगानं बदलण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेकडून अद्याप काँग्रेसकडं पाठिंब्यासाठी प्रस्ताव आलेला नाही. याबाबत हायकमांड काय निर्णय घेणार, याकडं आता काँग्रेस नगरसेवकांचं लक्ष लागलं आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास काँग्रेस सत्ताधारी पक्षात येणार का, आणि तसं झाल्यास विरोधी पक्षाची भूमिका भाजप बजावणार का, याची उत्सूकता आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने किशोरी पेडणेकर यांना रिंगणात उतरवले असून उपमहापौरपदासाठी अॅड. सुहास वाडकर यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने उमेदवार दिला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.