नगरमध्ये भाजपविरोधकांना एकत्र आणणार होतो, पण राष्ट्रवादीने घात केला- शिवसेना
बदलत्या परिस्थितीत भाजप नेतृत्व हरप्रकारे शिवसेनेशी जुळवून घ्यायला पाहत आहे.
मुंबई: अहमदनगर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी घात केला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, नगरच्या महापौर निवडणुकीसाठी मी स्वत: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे स्पष्ट झालेय. या कारणामुळेच शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस लगेच आमची जागा घेईल, असे रामदास कदम यांनी सांगितले.
युती झाली तर भाजपसोबत जाणार नाही- नारायण राणे
रामदास कदम यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होण्याच्या आशा आणखीनच धुसर झाल्या आहेत. एकीकडे बदलत्या परिस्थितीत भाजप नेतृत्व हरप्रकारे शिवसेनेशी जुळवून घ्यायला पाहत आहे. मात्र, शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यात आता शिवसेना भाजपविरोधकांची मोट बांधत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेना मतांची जुळवाजुळव करून पालिकेत आपला महापौर बसवेल, असा अंदाज होता. परंतु, तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली होती.
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा!