आताची मोठी बातमी! शिवशक्ती-भीमशक्ती युतीचं पहिले पाऊल, ठाकरे-आंबेडकरांची उद्या पहिली बैठक
फॉर्म्युला ठरणार, राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भिमशक्तीचा (ShivShakti-BhimShakti) प्रयोग पहायला मिळणार आहे. लवकरच महाराष्ट्रात (Maharashtra) नवी युती पहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटानं युती करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात उद्या पहिली अधिकृत बैठक पार पडणार आहे.
ठाकरे-आंबेडकरांची पहिली बैठक
उद्या दुपारी 12 वाजता वरळी इथल्या फोर सिझन हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि सुभाष देसाई उपस्थित रहाणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत युती करण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बेरजेचं राजकारण सुरु केलं आहे. याआधी संभाजी ब्रिगेड आणि आता वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करत उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं बोललं जात आहे. याआधीही शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग झाला होता.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एका मंचावर आले होते, त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानतंर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली होती. या बैठकीत वंचितने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही सांगण्यात आलं होतं.
मविआत सहभागी करुन घेणार?
शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीबाबत चर्चा होत असली तरी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करुन घेणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.