एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार होणार की नाही?
पगार न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांची हालाखीची परिस्थिती झाली असल्याचे चित्र आहे
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: एकीकडे राज्यात एसटी सेवा सुरू झाली असतांना आपला ऑगस्ट महिन्याचा पगार तरी होणार का याकडे सर्व म्हणजे ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीचे लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले गेले. यामुळे जुलै महिन्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार काही होऊ नाही. आता तर हळूहळू एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. काम सुरू झाले पण पगार होणार की नाही, याची शाश्वती नाही अशी एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था सध्या झालेली आहे.
ठाकरे सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; मुख्यमंत्री सहायता निधी तिजोरीतच पडून
पगार न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांची हालाखीची परिस्थिती झाली असल्याचे चित्र आहे. तेव्हा सरकारने एसटीचा आर्थिक भार उचलावा, पगार होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेनं केली आहे. नाहीतर कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची भीती कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे. तर एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असून कर्मचाऱ्यांचे पगाराचे योग्य नियोजन करू असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात एसटी सेवा सुरू झाल्यावर सर्वसामान्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी एसटी महामंडळ दिवसेंदिवस खड्ड्यात जात आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहून नेण्याचे बंधन असल्याने एसटीला दररोज सुमारे २२ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. एरवी प्रवासी वाहतुकीद्वारे एसटीला दररोज एक लाख फेऱ्यांच्या माध्यमातून २४ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळायचे. दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करायचे. २७ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार सुमारे १५ हजार एसटीच्या फेऱ्याद्वारे ३ लाख ४१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यामधून एसटीला जेमतेम दीड कोटी उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे.