ठाकरे सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; मुख्यमंत्री सहायता निधी तिजोरीतच पडून

राज्यातील नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरांतील आरोग्य सुविधांवर गरज असतानाही खर्च करण्यात आला नाही

Updated: Aug 31, 2020, 05:40 PM IST
ठाकरे सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; मुख्यमंत्री सहायता निधी तिजोरीतच पडून title=

मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारकडून उभारण्यात आलेला मुख्यमंत्री सहायता निधी वापराविना पडूनच आहे. राज्यातील आवश्यक आरोग्य सुविधांसाठीही त्याचा वापर झालाच नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप गेले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून जनतेला अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री सहायता निधी वापराविना पडून आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५५० कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, आतापर्यंत यापैकी केवळ १३२ कोटी २५ लाख रुपयांचा वापर करण्यात आला आहे. ही मदतही स्थलांतरित मजुरांना करण्यात आली होती. याशिवाय, राज्यातील नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरांतील आरोग्य सुविधांवर गरज असतानाही खर्च करण्यात आला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ आम्ही इतक्या चाचण्या केल्या, आम्ही सर्वप्रथम केलं, आम्हीच गोष्टी उपलब्ध करून दिल्या, असा कांगावा केला. मात्र, राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर वाढत असल्यामुळे सरकारचे अपयश समोर आले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांत आरोग्य सुविधांबाबत बोलायचे झाल्यास प्लाझ्मा थेरपीसाठी १६ कोटी आणि २० कोटी मुंबईतील एका रुग्णालयाला देण्यात आले. मात्र, बेड्सची संख्या वाढवणे, व्हेंटिलेटर्स आणि चाचण्यांची सुविधा वाढवणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले. अलीकडे वाळुजमध्ये एका कोरोना संशयित वृद्ध महिलेला झाडाखाली ऑक्सिजन सिलेंडर लावून बसवण्यात आल्याची घटना समोर आली. इतकी वाईट परिस्थिती सध्या राज्यात आहे. हे सरकार जनतेची मदत न करता, त्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.