ठाकरे सरकारचा भाजपला दणका; उच्च व तंत्रशिक्षण विभागातील नियुक्त्या रद्द
अशासकीय व्यक्तींची एखाद्या समितीवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्याचा पायंडा तसा जुनाच आहे.
मुंबई: ठाकरे सरकारने उच्च व तंत्रशिक्षण विभागातील नियुक्त्या रद्द करत भाजपला आणखी एक दणका दिला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अशासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे सर्वजण उच्च व तंत्रशिक्षण विभागातील विविध समित्यांवर काम करत होते. अशासकीय व्यक्तींची एखाद्या समितीवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्याचा पायंडा तसा जुनाच आहे. मात्र, उदय सामंत यांनी यापैकी बहुतांश सदस्य हे तज्ज्ञ नसून केवळ भाजपशी संबंध असल्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, असा आरोप केला.
RSS विचारसरणीच्या कुलगुरूंना पदावरून हटवा- आशिष देशमुख
त्यामुळे आता सरकारने नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून या समित्या नव्याने गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची फाईल पुन्हा उघडणार?
ठाकरे सरकारने आतापर्यंत भाजपच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. यामध्ये मुंबईतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धती पुन्हा सुरु करण्यापर्यंतच्या अनेक निर्णयांचा समावेश आहे. याशिवाय, भविष्यात न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. फडणवीस सरकारच्या अनेक कामांचा सध्याच्या ठाकरे सरकारकडून आढावा घेतला जात आहे. प्राधान्यक्रम लक्षात घेऊन यापैकी काही योजनांना स्थगिती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.