RSS विचारसरणीच्या कुलगुरूंना पदावरून हटवा- आशिष देशमुख

संघाच्या विचारसरणीचे कुलगुरू असल्यानेच हिंसाचाराची घटना घडली.

Updated: Jan 9, 2020, 04:08 PM IST
RSS विचारसरणीच्या कुलगुरूंना पदावरून हटवा- आशिष देशमुख title=

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीशी जवळीक असणाऱ्या राज्यातील कुलगुरू आणि प्र कुलगुरू यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) संघाच्या विचारसरणीचे कुलगुरू असल्यानेच हिंसाचाराची घटना घडली. 

अभविप आणि भाजपच्या गुंडांना विद्यापीठ प्रशासनाची मदत मिळाली. कारण, जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार हे संघाच्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास संघ विचारसरणीच्या कुलगुरू आणि प्र कुलगुरूंच्या नियुक्त्या रद्द झाल्या पाहिजेत, असे आशिष देशमुख यांनी म्हटले. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणीही करणार असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशातील शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करायचा आहे. त्यांचे हे प्रयत्न आज नव्हे तर दशकभरपासून सुरू आहेत. त्यासाठी अनेक विद्यापीठांमध्ये महत्वाच्या पदांवर संघ विचारसरणीच्या लोकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या लोकांमुळे महाराष्ट्राच्या विद्यापीठांमधील वातावरण खराब होऊ शकते, असे आशिष देशमुख यांनी म्हटले. 

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आशिष देशमुख यांचे हे वक्तव्य अवाजवी आहे. सूडाच्या भावनेतून ते जाणुनबुजून वाद उकरून काढत आहेत. संघ विचारसरणीचे लोक महत्वाच्या पदांवर असले तरी काय बिघडणार आहे?  ते पाकिस्तान, आयएसआय किंवा राष्ट्रद्रोही विचारसरणीचे नाहीत. त्यामुळे केवळ सूडाच्या भावनेने राजकारण केले तर जनता प्रत्युत्तर देईल, असे आशिष शेलार यांनी सांगितले. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x