चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा यंदा रद्द
गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळांचं यंदा १०१ वे वर्ष
देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करून तसेच सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी आणि गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. शासन जे निर्देश देईल त्यानुसार मूर्तीची उंची आणि मूर्ती बनविण्यात येईल. मूर्ती जागेवरच घडविण्याची चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शविली आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा रद्द करून काही पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता पोलीस प्रशासनावर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडणार नाही, याची मंडळाकडून दक्षता घेण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विभागीय वर्गणीदार यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदार यांना नियोजनानुसार ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतू चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात ईतर चिंतामणी भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव श्री.वासुदेव सावंत यांनी केले आहे.