फेरीवाल्यांच्या मुद्यावर राज ठाकरे आक्रमक, घेतली आयुक्तांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली. लोकांना फेरीवाल्यांची तक्रार करायची असल्यास त्यांचे फोटो पाठवण्याची सोय करण्याची मागणी राज ठाकरेंनी आयुक्तांकडे केली.
लोकांना व्हॉट्सअपवर फोटो पाठवण्यासाठी पालिकेने काही नंबर जाहीर करावेत. या व्हाट्सअप क्रमांकावर नागरिकांना त्यांच्या विभागातील किंवा रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो पाठवता येतील. आणि महापालिकेला फेरीवाल्यांवर नियमित कारवाई करणं तसेच या समस्येवर नियंत्रण मिळवणं सोपे जाईल असा मुद्दा राज ठाकरेंनी मांडला. या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पावलं उचलण्याचं आश्वासन दिले आहे.
गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेबाबत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. तसेच रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्यांही मांडल्या होत्या. रेल्वे पुलांवर दुकान मांडून ठाण मारणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी ठाकरे यांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेंटम दिलाय. अन्यथा १६ दिवसांपासून मनसे स्टाईलने आंदोलनाचा धमकी वजा इशारा दिला होता.
महापालिका आयुक्तांकडे मांडलेली संकल्पना राज ठाकरे रेल्वेच्या महाव्यवस्थपकांकडेही मांडणार आहेत. या कारवाई वजा मोहीमेमध्ये नागरिकांचाही तेवढाच सहभाग आणि जागरूकता अपेक्षित असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.