मुंबई: पालघरमध्ये जमावाकडून करण्यात आलेल्या साधुंच्या हत्येविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. अशाप्रकारे साधुंची हत्या होणे योग्य आहे का? कायदा आणि सुव्यवस्था कोणा एकाच्या हातात आहे का? हा प्रकार घडला तेव्हा पोलीस काय करत होते? एकूणच पालघर हत्याकांडातील सर्व घटनाक्रम विचार करायला लावणारा आहे, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर हत्याप्रकरणावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले, म्हणाले...

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सर्वचजण भारतमातेची लेकरे आहेत. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. दोन्ही बाजूंनी भीती आणि द्वेष पसरवला जाऊ नये. विवेकपूर्ण आणि जबाबदार विचार करणाऱ्यांनी आपापल्या समुदायाला यापासून वाचवले पाहिजे. तसे झाले नाही तर देशात काय घडेल, असा सवाल मोहन भागवत यांनी उपस्थित केला. 



काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये जमावाने दरोडेखोर समजून दोन साधू आणि एका ड्रायव्हरची हत्या केली होती. हत्या झालेले तिघेजण कांदिवली येथे राहणारे होते. तिघेही मयत हे त्रंबकेश्वरचे दक्षिणमुखी आखाड्याशी संबंधित आहेत. हे तिघे दादरा नगर हवेलीकडे जायला निघाले होते. खरे तर लॉकडाऊन असल्याने रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी हे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांना दगड, बॅट आणि बांबूने ठेचून मारले होते. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) सोपवला होता.