दीपक भातुसे, मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याचा फटका मंत्रालयालाही बसायला लागला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयातील तीन मंत्र्याची कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन मंत्री कार्यालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही मंत्री कार्यालये तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. यात अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. 


ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे मंत्रालयातील कार्यालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने ते आधीच हुतात्मा चौक इथल्या एचएसबीसी इमारतीतील महावितरणच्या कार्यालयात हलवण्यात आले आहे. नितीन राऊत यांच्या कार्यालयात काम करणारे ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 


उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी हे कार्यालय संध्याकाळी घाईगडबडीने बंद करण्यात आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले. उदय सामंत सध्या मंत्रालया समोरील आपल्या शासकीय निवासस्थानामधून खात्याचा कारभार पाहत आहेत.


राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांचे मंत्रालयातील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.