कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा खात्यात कसा सावळागोंधळ सुरू होता, त्याचंच हे आणखी एक उदाहरणं... देशमुखांच्या बेकायदेशीर आदेशांमुळं एकाच घरात दोन दोन रेशन दुकान परवाने वाटण्यात आले. एजंटांची भ्रष्टा साखळी यामागं असल्याचं सांगितलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडूपमधील हितेश गणात्रा यांचं ३० ई ६८ नंबरचं रेशन दुकान आहे. त्यांचा मुलगा रितेश गणात्रा मुलुंडमध्ये असंच एक रेशन दुकान भागिदारीत चालवतो. हितेश यांचे भाऊ किशोर गणात्रा आणि त्यांचा मुलगा विशाल गणात्रा यांच्या नावावरही रेशन दुकानं आहेत. म्हणजे एकाच घरात दोन दोन रेशन दुकानं... मुंबईत अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. 


हे सर्व घडलं ते माजी मंत्री अनिल देशमुखांच्या कृपेनं... अनिल देशमुखांनी काढलेल्या त्या वादग्रस्त १२८ आदेशांपैकीच हे आदेश... नियमानुसार एका कुटुंबात दोन रेशन दुकानं देता येत नाहीत... परंतु थेट मंत्री महोदयांनीच आदेश काढल्यानं त्याची अंमलबजावणी कशी करायची? असा प्रश्न प्रशासनाला पडलाय. याबाबत शिधावाटप उपनियंत्रक, ई परिमंडळानं सचिवांकडं विचारणा केलीय. १९ जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत १२ पत्रं अन्न - नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला पाठवण्यात आली. पण सचिव स्तरावरून काहीच मार्गदर्शन केले जात नसल्याची तक्रार पुढं आलीय.


कुर्ला पश्चिमला राहणारे तुशांत खंदारे यांच्या नावावर एक रेशन दुकान आहे. हे दुकान आधी त्यांच्या अपंग आईच्या नावावर होतं. आईच्या मृत्यूनंतर त्यांचं वारसा हक्कानं नाव लावले गेलं. परंतु त्याचवेळी आणखी एका भागीदाराचंही नाव या रेशन दुकानाला लावलं गेलं... तेदेखील मूळ मालकाला अंधारात ठेवून...


मुंबईत अनेक रेशन माफिया निर्माण झालेत. ज्यांच्या कुटुंबियांच्या नावावर अनेक रेशन दुकानं आहेत. काही त्यांनी चालवायलाही घेतली आहेत. हेच रेशन माफिया आणि अन्न नागरी पुरवठा खात्यातल्या अधिका-यांच्या संगनमतातून मग रेशनच्या अन्नधान्याचा काळाबाजार घडवून आणला जातो.