मुंबई : राज्यातल्या निवडणूक निकालाला १३ दिवस झाल्यानंतरही सत्तास्थापनेची कोंडी काही फुटायचं नाव घेत नाहीये. शिवसेना ही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि समसमान खातेवाटपावर अडून बसली आहे. तर भाजप मात्र मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहील यावर ठाम आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंचे सल्लागार किशोर तिवारी यांनी मोहन भागवतांना पत्र लिहिलं आहे. राज्यातला हा पेच सोडवण्यासाठी मोहन भागवतांनी सर्वोच्च प्राध्यान्य द्यावं आणि नितीन गडकरींना मध्यस्थी करायला सांगावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी युती धर्माचा मान राखतील आणि दोन तासांमध्ये हा गुंता सोडवतील. असा विश्वास किशोर तिवारी यांनी आयएएनएसशी बोलताना व्यक्त केला आहे. हा पेचप्रसंग सुटल्यानंतर उद्धव ठाकरे पहिले ३० महिने मुख्यमंत्री आणि पुढच्या ३० महिन्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा दावा तिवारींनी केला आहे.


'देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आत्मकेंद्री आणि उद्दाम आहे, त्यामुळे नितीन गडकरींसारख्या अनुभवी राजकारण्याने हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी आणि युतीच्या विकासासाठी राज्यात यावं,' अशी प्रतिक्रिया तिवारींनी दिली आहे.


एकीककडे काल देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि नितीन गडकरींची भेट घेतली. तर दुसरीकडे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातही चर्चा झाली. याचवेळी उद्धव ठाकरेंच्या सल्लागाराने मोहन भागवतांना पाठवलेल्या पत्राचं टायमिंग महत्त्वाचं मानलं जातंय.