`मी म्हणजेच सगळं असा समज करुन घेऊ नये`; समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनानंतर उद्धव ठाकरेंचा टीका
Uddhav Thackeray : सरकार येत जात असते. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झालेत आणि होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच काम झाले असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला
Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अखेर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आले. समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज करण्यात आले आहे.. यासोबतच पंतप्रधानांनी मेट्रो, नागपूर रेल्वे स्टेशन, वंदे भारत एक्सप्रेस, एम्स रुग्णालय सारख्या विविध प्रकल्पाचे देखील पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधानांनी शिंदे-फडणवीस सरकारचा डबल इंजिनचे सरकार असा उल्लेख करत कौतुक केले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पावरुन भाष्य केले आहे. ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
सरकार येत जात असते - उद्धव ठाकरे
"पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात आज मोठ्या विकासकामांचे लोकार्पण केले. त्यात काही जण म्हणाले की हे मी केले. अरे बाबा सरकार येत जात असते. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झालेत आणि होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच झाले आणि त्याच्या आधी आणि नंतरही होणार नाही असं काही नसतं. त्यामुळे कोणीही समज करुन घेऊन नये की, मी म्हणजेच सगळं काही. पण असा समज काही जणांचा झालेला आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बैठका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कार्यक्रमात भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्याचे म्हटले. "आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचं लोकार्पण होत आहे. यात खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं
पंतप्रधान मोदींनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारचे जोरदार कौतुक केले. "आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण 24 जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.