मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे विधिमंडळात आले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस हेदेखिल उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाआघाडीचे नेतेही उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे उमेदवार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीदेखिल अर्ज दाखल केला.  मुख्यमंत्री अर्ज दाखल करायला आले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख आदी नेते उपस्थित होते.


शिवसैनिक आणि जनता हीच उद्धव ठाकरेंची संपत्ती


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्याने प्रथमच त्यांची संपत्ती जनतेसमोर येणार आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसैनिक आणि राज्यातील जनता हीच उद्धव ठाकरे यांची संपत्ती आहे.


भाजपच्या चार प्रमुख उमेदवारांनी गेल्या आठवड्यात अर्ज दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांनी आज अर्ज भरला. काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून संदीप लेले आणि रमेश कराड, तसेच राष्ट्रवादीकडून किरण पावसकर यांनीही अर्ज भरले आहेत. हे तीन अर्ज मागे घेतले जातील आणि विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र आहे. एखाद्या अर्जात गडबड झाली तर खबरदारी म्हणून दोन अर्ज जादा भरले आहेत, असे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. संकटमय परिस्थितीत मुख्यमंत्री निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, हीच भाजपची भावना असल्याचे दरेकर म्हणाले.


 



अर्जाची छाननी झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे अतिरिक्त उमेदवार अर्ज मागे घेतील आणि त्यानंतर निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर होईल.