Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाजपसोबत येतील, मोदींचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे बेचैन झालेत असा दावा आमदार रवी राणा यांनी केलाय. उद्धव ठाकरे विधानसभेपूर्वी (Vidhansabha Election 2024) भाजप सोबत येतील असं रवी राणा यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. त्याचं चिंतन मातोश्रीवर सुरू आहे. त्यांना आता पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, मोदीजींच्या नेतृत्वाला उद्धव ठाकरे स्वीकारतील असंही रवी राणा यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहे. संजय राऊत हे दिल्लीत आहेत पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचे शिवाजी महाराजांबद्दल बेगडी आदर आहे असा आरोप रवी राणा यांनी केलाय. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन एनडीएत आले. आता अजित पवार मोदींजी सोबत आले आहेत असंही रवी राणा यांनी सांगितलं.


'भविष्यात आदित्य, उद्धव ठाकरे एकटेच राहातील'
राज्यातील असो किंवा देशातील काँग्रेस असो, मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे खासदार आणि लोक भाजापात येणार आहेत, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.  पुढच्या काळात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकटेच राहतील, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. आदित्य ठाकेर सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत, दौरा त्यांना लखलाभ, पण आदित्यजी कुठे आहेत, हे त्यांच्या वरळी मतदारसंघातील लोकं दुर्बीण लावून शोधत आहेत, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. 


कोळी समाजाचे लोक दोन पिलरमधल्या अंतराबाबत आदित्यजींच्या मागे लागले होते शेवटीं मुख्यमंत्री शिंदेनी प्रश्न सोडवला. अनेक प्रश्न वरळीत पडले आहेत, या सगळ्याकडे न बघता ते गावभर फिरत आहेत.
आणि आदित्य ठाकरे निवडणुकीवर बोलत आहेत आदित्यजी निवडणुकीची खुमखुम असेल तर राजीनामा द्या आणि आमच्या महायुतीविरिधात लढा, आता वरळीत लाथ बसणार आहे. त्यामुळे ठाण्यात येतो येतो करत आहेत असा हल्लाबोल शेलार यांनी केला


ठाकरे गटाची लोकसभा तयारी
दरम्यान, ठाकरे गटाकडून 18 लोकसभा जागा लढण्याचं निश्चित झालंय. महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी समन्वयक नेमलेयत. यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांपैकी 4 जागा ठाकरे लढणार असल्याचं बोललं जातंय. मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या जागा ठाकरे गट लढणार आहे. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली असून, लोकसभा समन्वयकांमध्ये अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी दिलीय. यात मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलीय.