मुंबई : विधान परिषदेच्या १० रिक्त जागांपैकी भाजपने ५ जागांवर आपली दावेदारी सांगितली आहे. त्यानुसार दिल्लीतून पाच उमेदवारणाची नवे जाहीर करण्यात आली आहे. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे यांच्यासोबतच श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेमधून भाजपात आलेले प्रवीण दरेकर यांना भाजपने विधान परिषदेवर संधी देत त्यांना थेट विरोधी पक्षनेते पद दिले. तर, राष्ट्रवादीमधून आलेले प्रसाद लाड यांनाही भाजपने विधान परिषदेवर पाठविले होते. या दोघांनाही भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे.


कर्जत विधानसभेतून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले माजी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू राम शिंदे यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे.


तर, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या दोन नव्या चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र, त्यांना संधी नाकारून भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.


दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या त्या समर्थक असून भाजपने एक वेगळीच खेळी खेळली आहे. उमा खापरे या भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग दोन वेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केले आहे. 2001-2002 मध्ये पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.


महिला मोर्चा प्रदेश सचिव पदासह त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. 2000 ते 2002 भाजप महिला मोर्चा सचिव तर 2002 ते 20011 तीन टर्म भाजप महिला मोर्चा सरचिटणीस होत्या. 2017 ते 2020 या काळात त्या सोलापूरच्या प्रभारी होत्या. 


दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं.


विधान परिषदेच्या या स्पर्धेत भाजपने दिलेले दुसरे उमेदवार आहेत श्रीकांत भारतीय. ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांचे ओएसडी होते.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे ते प्रमुख होते.