मुंबई : कोरोनाविरुद्ध (Covid-19) सुरु असलेल्या लढाईत दिवाळीच्या मुहूर्तावर एक चांगली बातमी आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोवॅक्सिन लशीच्या (Covaxin) आपात्कालीन वापराला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कोवॅक्सिन लस घेतलेल्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय परदेश प्रवास करता येणार आहे. याआधी कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीय नागरिकांना परदेशात क्वारंटाईनच्या नियमांचं पालन करावं लागत होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोवॅक्सीन ही भारत बायोटेकची लस आहे. कोविड-19 रोगाच्या लक्षणांवर 77.8% आणि विषाणूच्या नवीन डेल्टा स्वरूपाविरूद्ध 65.2% पर्यंत कोवॅक्सिन प्रभावी आहे. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराबाबतच्या संमतीसाठी तज्ज्ञ समितीकडून शिफारसही करण्यात आली होती. तज्ज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच G20 बैठकीत या लसीच्या मंजुरीचा मुद्दा उपस्थित केला होता. लसीला WHO ची मान्यता मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत अभिनंदन केलं आहे. 'हे सक्षम नेतृत्वाचे लक्षण आहे, ही मोदीजींच्या संकल्पाची कहाणी आहे, ही देशवासियांच्या विश्वासाची भाषा आहे, हीच दिवाळी आहे. स्वावलंबी भारताची, असं ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.


भारताच्या लसीकरण मोहीमेत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचा सर्वाधिक उपयोग केला जात आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनला मंजुरी मिळण्यासाठी WHO ची मान्यात मिळणं आवश्यक होतं. आता WHO नेही कोवॅक्सिन लसीला मंजुरी दिल्याने हे भारताचं मोठं यश मानलं जात आहे.