पृथ्वीराज चव्हाण अचानक सक्रीय का झाले?
पृथ्वीराज चव्हाण राज्यात अचानक ऍक्टिव्ह व्हायचं कारण काय?
श्रेयस देशपांडे, झी मीडिया, मुंबई : पृथ्वीराज चव्हाण.... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडशी थेट संवाद असलेल्या राज्यातल्या ठराविक काँग्रेस नेत्यांपैकी एक अशी पृथ्वीबाबांची ओळख. महाराष्ट्रात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण पडद्याआड गेल्याचं चित्र दिसलं. सहा महिने शांत असलेले पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अचानक ऍक्टिव झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने राज्याला किती मदत केली? याची आकडेवारी दिली. यानंतर अवघ्या तासाभरातच पृथ्वीराज चव्हाण यांनी या आकडेवारीवरून फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं. विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सरकारमधला एखादा मंत्री पुढे येण्याआधीच पृथ्वीराज चव्हाण यांनीच एन्ट्री घेतली. दुसरीकडे महाविकासआघाडीतले मंत्री अनिल परब यांनी २४ तासात देवेंद्र फडणवीस यांच्या आकडेवारीची पोलखोल करू, असं सांगितलं.
व्हायरल क्लिप आणि 'क्रोनोलॉजी'
त्याआधी तीन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यासोबत संवाद साधतानाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये राज्यातलं सरकार हे शिवसेनेचं आहे, आमचं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण या कार्यकर्त्याला सांगत आहेत. तसंच संधी द्यायची वेळ होती, तेव्हा संधी देण्यात आली नाही, असं म्हणत त्यांनी नाराजीचा सूरही लावला. पृथ्वीराज चव्हाण यांनी अजूनही या क्लिपबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
राज्यातलं सरकार हे काँग्रेसचं नसून शिवसेनेचं असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितल्यानंतर दोनच दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. महाराष्ट्रातल्या सरकारला आमचा पाठिंबा असला तरी आम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यायच्या भूमिकेत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे पृथ्वीबाबांचे थेट दिल्लीत असलेला संपर्क, त्यांनी राज्यातल्या सरकारबाबत केलेलं वक्तव्य आणि मग राहुल गांधींनीही पृथ्वीराज चव्हाणांच्याच वक्तव्याची ओढलेली री. ही क्रोनोलॉजी विचार करायला लावणारी आहे.
सोनं ताब्यात घ्यायची मागणी
देशातील सर्व धार्मिक स्ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात सोने पडून आहे. ते सरकारने व्याजावर घेतले पाहिजे. एक-दोन टक्के व्याजदरावर परतीच्या बोलीवर हे सोने ताब्यात घेऊन वापरले पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
मोदी सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनीच जीडीपीच्या १० टक्के पॅकेज द्यावं, अशी मागणी केली होती. केंद्र सरकारने हे पॅकेज दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी या पॅकेजवर टीका केली, तसंच हे पॅकेज जीडीपीच्या १ टक्काही नसल्याचं सांगितलं.
उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्नचिन्ह
कोरोना संकटामध्ये राज्यातील नेतृत्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवलं पाहिजे, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्याआधी ऐन अधिवेशनात पृथ्वीराज चव्हाण यांनी समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. विधानसभेत झालेल्या या आरोपांमुळे राज्य रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले.
२०१४ सालीच शिवसेनेला काँग्रेससोबत युती करायची होती, असं वक्तव्यही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्यावेळीही पृथ्वीराज चव्हाण शिवसेनेला अडचणीत आणतायत का? असा प्रश्नही उपस्थित झाला होता.
पृथ्वीराज चव्हाणांचं सक्रीय व्हायचं कारण काय?
राज्यात महाविकासआघाडी सरकार आणण्यासाठीच्या सगळ्या बैठकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून उपस्थित होते. या बैठकांना उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांनी पुढे मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसडूनही सुरुवातीला विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेतलं गेलं, पण राष्ट्रवादीने याला विरोध केल्याचं तेव्हा बोललं गेलं. याच कारणामुळे पृथ्वीराज चव्हाण व्हायरल झालेल्या त्या क्लिपमध्ये 'जेव्हा संधी होती, तेव्हा दिली नाही', असं म्हणाले का? हा प्रश्न उपस्थित होतोय.
काँग्रेसची रणनिती?
महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसची भूमिका ही तिसऱ्या पक्षाची आहे. भविष्यामध्ये निवडणूक लढताना तिसऱ्या पक्षाची भूमिका घेणं काँग्रेसला परवडणारं नाही. यामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या अस्तित्वालाच याचा फटका बसू शकतो. त्यामुळे मागची ५ वर्ष भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेने अवलंबलेली टीका करण्याची रणनिती काँग्रेस पृथ्वीराज चव्हाणांकरवी राबवून घेत आहे का?
पृथ्वीराज चव्हाणांची इमेज
२०१० साली अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीतून महाराष्ट्रात आले. पुढची ४ वर्ष पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांची मिस्टर क्लीन ही इमेज जपली. याचवेळी सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते अजित पवार, सुनिल तटकरे अडचणीत आले. आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकाही करण्यात आली. फाईलवर सही करण्यासाठी हाताला लकवा झाल्याचा निशाणा तर खुद्द शरद पवारांनीच साधला.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन झाली असतानाच, पृथ्वीराज चव्हाण यांची मिस्टर क्लिन असलेली इमेज तशीच कायम राहिली. पृथ्वीराज चव्हाणांच्या याच प्रतिमेचा आणि अभ्यासू राजकारणाचा काँग्रेसला राज्यात पुन्हा उभारी मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.