राज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवले पाहिजे; चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. 

Updated: May 16, 2020, 09:10 PM IST
राज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवले पाहिजे; चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळताना महाराष्ट्रातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य आणि दूरदृष्टी दाखवण्याची गरज असल्याचे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हातात राज्य सरकारविरोधात आयते कोलीत मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील कारभार मुख्यमंत्री नव्हे तर अधिकारीच चालवत असल्याची टीका केली होती. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची री ओढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

‘कोरोना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सोने ताब्यात घ्या!’

पृथ्वीराज चव्हाण पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वार्तालापात सामील झाले होते. यावेळी त्यांनी मांडलेल्या परखड मतांमुळे महाविकासआघाडीची अडचण होण्याची शक्यता आहे. यावेळी चव्हाण यांनी म्हटले की, राज्यातील नेतृत्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवण्याची गरज आहे. चांगल्या अधिकाऱ्यांची योग्य ठिकाणी तातडीने नियुक्ती करून त्यांना कामाला लावायला पाहिजे. कोरोनाच्या पर्शवभूमीवर राज्याला पुढे घेऊन जाताना दूरदृष्टी ठेवावी लागेल. प्रशासनातील अधिकारीच कारभार चालवतात असे जाणवते. त्यामुळे राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसून येतो, अशी टिप्पणी यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

साहेबांनी 'कुक्कुटपालना'साठीही केंद्राला उपाययोजना सुचवल्यात; रोहित पवारांचा राणेंना टोला

तसेच स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्यातही केंद्रासोबत राज्य सरकारनेही घोडचूक केल्याची कबुली यावेळी चव्हाण यांनी दिली. या लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप पणे पोचवण्यासाठी पैसे खर्च केले पाहिजे. त्यात सरकार अपयशी ठरल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. आगामी काळात राज्यातील अनेक मोठ्या प्रकल्पांना कात्री लावण्याचे सूतोवाचही चव्हाण यांनी केले. बुलेट ट्रेनचा निर्णय अविचारी आहे. त्यासोबत राज्यात सुरु असलेल्या अनेक विकास प्रकल्पांचे काम थांबवावे लागेल, असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.