मुंबई: मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयातील ५२ कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. कालच मुंबई महानगरपालिकेकडून वोकहार्ट रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला होता. याठिकाणी कंटेनमेंट झोनचे फलकही लावण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठी बातमी : कुर्ल्यात कोरोनाचे १४ रुग्ण, झोपडपट्टीच्या परिसरात व्हायरसचा वेगाने फैलाव

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते. कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी यासाठी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले होते. मात्र, वोकहार्ट रुग्णालयाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. 


'डॉक्टरांना काही झालं तर अंत निश्चित...'

यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आले होते. रुग्णालय सील करण्यात आल्यामुळे ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवाही बंद करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक रुग्णांना घरी पाठवण्यात आले होते. 
कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनाची लागण झालेले आणि संशयित असे जवळपास २० रुग्ण वोकहार्टमध्ये दाखल करण्यात आले होते. यापैकी कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पण, संशयितांना मात्र अन्य रुग्णांसोबत अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याने इतरांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्संना एन ९५ मास्क, कोरोनाप्रतिबंधक पोशाख अशी कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती.