'डॉक्टरांना काही झालं तर अंत निश्चित...'

हजारो लोक कोरोना सारख्या धोकादायक विषाणूमुळे मृत्यूमुखी पडली आहेत.   

Updated: Apr 7, 2020, 01:34 PM IST
'डॉक्टरांना काही झालं तर अंत निश्चित...'

मुंबई : सध्या फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. हजारो लोक या धोकादायक विषाणूमुळे मृत्यूमुखी पडली आहेत, तर लाखो नागरिकांना या संसर्गाची लागण झाली आहे. यामध्ये डॉक्टरांचा देखील समावेश आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करत डॉक्टरांविषयी चिंता आणि काळजी व्यक्त केली आहे. मोदींच्या भूमिकांना अनुरागने विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपले  विचार मांडले आहेत.

डॉक्टरांची काळजी व्यक्त करत त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'देशाला वाचवण्यासाठी डॉक्टर नर्स आणि सर्व स्वास्थ्य कर्मचाऱ्यांचं आरोग्य सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना काही झालं तर थाळ्या वाजवा, दिवे लावा नाहीतर दुसऱ्या कार्यक्रमाचे  नियोजन करा. अंत निश्चित आहे. ' अशा आशयाचं ट्विट त्याने केलं आहे. 

अनुरागने #DocsNeedGear #TestKaroNa हे हॅश टॅग त्याच्या पोस्टला जोडले आहे. सांगायचं झालं तर देशातील डॉक्टरांवर देखील कोरोनाचं सावट आहे.  तर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसागणित वाढ होताना दिसत आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.