मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. आता कुर्ल्यात देखील कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळले आहेत. कुर्ल्याच्या एल विभागात एकूण १४ रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. १४ पैकी ८ रुग्ण झोपडपट्टीमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. कुर्ल्याच्या पश्चिम भागातील जरीमरी, पाईप रोड या भागातील झोपडपट्टींमध्ये रूग्ण मिळू लागल्याने धोका वाढू लागला आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता याठिकाणी टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिवाय, रूग्ण मिळालेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जात आहे. तर दुसरीकडे वरळीचा भाग येत असलेल्या जी दक्षिण विभागात कोरोनाचे रूग्ण वेगाने वाढत आहेत. याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. तर भायखळ्याचा भाग असलेल्या ई विभागात ४८ रुग्ण, मलबार हिलच्या डी वॉर्डात ४० रुग्ण आणि अंधेरी पश्चिमच्या के पश्चिम विभागात ४० रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णांचा हा आकडा दिवसागणिक वाढत असल्यामुळे कोरोनाबद्दल अतिदक्षता घेण्याची गरज भासत आहे. दरम्यान, एकट्या मुंबईत कोरोनाचे नवे ७० रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा आता ५२८ वर गेला आहे. तर सोमवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चाललीय. कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८७२ वर पोहोचलीय. तर मृतांचा आकडा ५२वर गेलाय. गेल्या २४ तासांत राज्यात नवे १२४ रूग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.