मुंबईकरांना सावध करणारी बातमी; भाजी विक्रेती म्हणून घरोघरी फिरणारी महिला निघाली अट्टल गुन्हेगार
Mumbai Live News: मुंबईत घरफोड्या करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Mumbai Crime News: मुंबईकरांना सावध करणारी एक बातमी समोर येतेय. भाजी विक्रेता असल्याचा बनाव रचून घरफोडी करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. निलोफर खान वय 60 असं आरोपी महिलेचे नाव आहे. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हा भाजीविक्रेती बनून बंद असलेल्या घरांची रेकी करायची आणि दिवसाढवळ्या घरफोडी करायची.
संतोष नगर आणि अप्पर गोविंद नगर परिसरात अलीकडेच घरफोडी करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 26 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान या घटना घडल्या होती. त्यानंतर घरफोडी प्रकरणी पोलिस अॅक्शन मोडवर आले होते. त्यापद्धतीने त्यांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली. तेव्हा निलोफर खान पोलिसांच्या रेकॉर्डवर आली. पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवल्यावर गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलोफर खानने आत्तापर्यंत 3 लाख रुपये किंमतीच्या वस्तु चोरल्या आहेत. त्यात रोख रक्कम आणि दागिनेदेखील आहेत. खान हिच्या नावावर यापूर्वीही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वी कुरार पोलिसांनी निलोफरला घरफोडी प्रकरणात अटक केली होती. तिच्या अटकेनंतर तिने पठाणवाडी येथील तिचे घर भाड्याने दिले आणि जवळच्याच परिसरात भाड्याने राहू लागली. तिचा पती सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो तर मुलगा ड्रायव्हर म्हणून कामाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलोफर चोरी केलेले दागिने विकत असे आणि त्या पैशांतून ती फ्रीज, टिव्ही, वॉशिंग मशिनसारख्या वस्तु खरेदी करत असे. संतोष नगर येथून आरोपी महिलेने रोख रक्कम आणि दागिने असे मिळून 1,12,000 हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. तर, अप्पर गोविंद नगर येथे तिने जवळपास 1,78,000 रुपयांचा ऐवज चोरी केला होता.
चोरीची तक्रार मिळाल्यानंतर, एपीआय डॉ चंद्रकांत घार्गे आणि त्यांच्या पथकाने स्मिता पाटील, डीसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान पठाण, दिंडोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज पडताळून पाहिले, यावेळी त्यांना खान संशयास्पद अवस्थेत परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. बंद घराचे कुलूप तोडण्यात पटाईत असल्याचेही पुढे चौकशीत आढळून आले. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी थेट कारवाई केली.
पोलिसांनी निलोफरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिला गुन्ह्यांबाबत विचारले असता तिने पहिले काहीही सांगण्यास नकार दिला. नंतर पोलिसा खाक्या दाखवताच तिने आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.