मुंबई : वरळी-वांद्रे सी-लिंक प्रकल्पाचे वर्सोवापर्यत विस्ताराचे काम अद्याप सुरू असताना, हाच सेतू आता थेट विरारपर्यत नेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तो अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीकडे पाठवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळी-वांद्रे सी-लिंक वर्सोवामार्गे विरारपर्यंत नेला जाणार आहे. प्रकल्प २०२४ च्या अखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यासाठी ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नरिमन पॉईंट ते विरार प्रवास साडेतीन तासांचा आहे. पण विस्तारानंतर फक्त सव्वा ते दीड तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे.


गुरुवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला. वर्सोवा ते विरार मार्ग ५२ किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावरून दररोज किमान दीड लाख वाहने धावतील अशी शक्यता आहे.


कोस्टल रोडवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतर नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. वांद्रे ते वर्सोवा मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.