श्रेयस देशपांडे, झी डिजीटल, मुंबई: मॅच फिक्सिंग स्कँडल ते कोच बॉब वूल्मर यांचा 2007 च्या वर्ल्ड कप दरम्यान झालेला मृत्यू. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेट वादामध्येच राहिलं. पण या वादांपासून नेहमी लांब राहिलेला खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट आणि वाद असं समिकरणच क्रिकेट विश्वामध्ये असताना शाहिद आफ्रिदी मात्र कायमच वेगळा राहिला. पण पाकिस्तानपेक्षा भारतामध्ये जास्त प्रेम मिळतं असं वक्तव्य करून आफ्रिदीनं पाकिस्तानमधल्या क्रिकेट रसिकांची नाराजी ओढवून घेतली आहे. 


तु भारतातच राहा, पाकिस्तानमध्ये परत येऊ नकोस असे सल्ले आफ्रिदीला पाकिस्तानमधल्या क्रिकेट रसिकांनी दिले. फक्त क्रिकेट रसिकच नाही तर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. असं वक्तव्य करणाऱ्या शाहिद आफ्रिदीची लाज वाटते असं जावेद मियादाद म्हणाला आहे. 


पण शाहिद आफ्रिदीचं भारताविषयीचं वक्तव्य हे आत्ताच का आलं ? याविषयी अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत. शाहिद आफ्रिदी आता त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे रिटायरमेंटनंतरची प्लॅनिंग आफ्रिदी करतोय का असे प्रश्न उपस्थित व्हायला जागा आहे. 


भारतातलं क्रिकेटचं मार्केट आणि त्यातून किती पैसा मिळतो हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. भारताच्या सगळ्या आंतरराष्ट्रीय मॅचवेळी आता हिंदी कॉमेंट्रीला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या प्री मॅच आणि पोस्ट मॅच शोमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंदीचा वापर केला जातो. तसंच न्यूज चॅनलमध्येही क्रिकेट एक्सपर्ट म्हणून माजी क्रिकेटपटूंना मोठी मागणी असते. 


पाकिस्तानच्या क्रिकेटपटू आणि कलाकारांना भारतात परफॉर्म करायला अनेक संघटना विरोध करतात, त्यामुळे भविष्यात भारतामध्ये कॉमेंट्रीची संधी मिळाली तर या वक्तव्याचा दाखला देऊन विरोध कमी करायचा आफ्रिदीचा प्रयत्न आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. 


आफ्रिदीविषयी हे प्रश्न उपस्थित व्हायचं कारण म्हणजे, वीरेंदर सेहवागनं काही दिवसांपूर्वी दिलेली प्रतिक्रिया. भारतामध्ये कॉमेंट्री करायला आलेला पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरवर याच मुद्द्यावरू सेहवागनं टीका केली होती. 


भारतामध्ये येऊन शोएबला कॉमेंट्रीकरून पैसा कमवायचा आहे, म्हणून तो भारतीय खेळाडूंचं एवढं कौतुक करतो असं सेहवाग म्हणाला होता. मी जेव्हा शोएबविरुद्ध खेळायचो तेव्हा तो कधीच आमचं कौतुक करायचा नाही, अशी प्रतिक्रिया सेहवागनं दिली होती. 


वीरेंदर सेहवागनं शोएब अख्तर विषयी दिलेली ही प्रतिक्रिया अंत्यत बोलकी आहे. दहशतवादामुळे आधीच पाकिस्तानचं क्रिकेट उद्धवस्त झालं आहे. श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आजपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय मॅच झाली नाही. याच काळामध्ये भारताच्या क्रिकेटची आणि बीसीसीआयची आर्थिक भरभराट झाली. त्यामुळे आफ्रिदीचं आत्ताच उफाळून आलेलं भारत प्रेम म्हणजे रिटायरमेंटनंतरची लाईफ इन्स्यूरन्स पॉलिसी असल्याचं बोललं जात आहे.