नवी दिल्ली : दुडू-दुडू धावणाऱ्या मन कौर... वय अवघं 101 वर्ष... ऑकलंडमध्ये झालेल्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौर यांनी शंभर मीटरचं हे अंतर एक मिनिट आणि चौदा सेकंदात पूर्ण केलं. अर्थात या स्पर्धेत असणारे इतर स्पर्धक केव्हाच पुढे निघून गेले होते... पण जिंकलेल्या स्पर्धकाचंही कौतुक झालं नसेल इतकं या 101 वर्षांच्या आजीचं झालं.


मुळात शंभर वर्षांची आजी अॅथलिटचे कपडे घालून रनिंग ट्रॅकवर धावतेय, हाच आश्चर्याचा सुखद धक्का होता. त्यामुळे या एकशे एक वर्षाच्या आजीला प्रेक्षक उत्साहानं चिअर अप करत होते. तिनं शंभर मीटर अंतर पूर्ण करताच तिचा प्रोत्साहनपर 'गोल्ड मेडल' देऊन सन्मान करण्यात आला.


17 वं गोल्ड मेडल


मन कौर या आजीबाईंचं इंटरनॅशनल स्पर्धांमधलं हे सतरावं गोल्ड मेडल आहे. मन कौर या मूळच्या पंजाबमधल्या चंढीगडच्या... सगळं आयुष्य सुखात जगून झाल्यावर त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अॅथलिट म्हणून करिअर सुरू केलं. त्याआधी त्यांचा कुठल्याही खेळाशी संबंधही नव्हता.


त्यांचा मुलगा गुरूदेव सिंग यानं एकदा सहज त्यांना एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुचवलं. आजींचा उत्साह दांडगा होता... डॉक्टरांनी 'ऑल इज वेल'चं सर्टिफिकिट देताच त्या रनिंग ट्रॅकवर उतरल्या आणि त्यांच्या अॅथलिट म्हणून करिअरला सुरुवात झाली. 


विशेष म्हणजे, स्पर्धांच्या मौसममध्ये या आजी स्ट्रिक्ट डाएटवर असतात. रोज व्यायामही करतात. मायलेकांची ही जोडी इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये भाग घेते. त्यांच्या मुलाला यश मिळो न मिळो, मन कौर मेडल जिंकतातच... ऑकलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत मन कौर यांनी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत मेडल मिळवलंय, आता स्प्रिंट अर्थात जोरात पळणे, गोळाफेक आणि भालाफेक या स्पर्धांमध्येही या आजी भाग घेणार आहेत... आणि त्यांच्या खात्यावर वीस मेडल्स पूर्ण करणार आहेत.


101 वर्षांच्या आजीच्या या स्पिरीटला, फिटनेसला, इच्छाशक्तीला आणि मेहनतीला सलाम...