मध्य रेल्वेनं प्रवास करतात एवढे फुकटे प्रवासी
मध्य रेल्वेच्या टीसींनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 120.57 कोटी रुपये वसूल केले आहेत.
मुंबई: मध्य रेल्वेच्या टीसींनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 120.57 कोटी रुपये वसूल केले आहेत. एकूण 24.31 लाख फुकट्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
2014-15 मध्ये हीच रक्कम 101.16 कोटी रुपये होती. एका वर्षामध्ये 19.19 टक्क्यांची ही वाढ आहे.
एकाच महिन्यात 9.11 कोटींची वसुली
फक्त मार्च 2016 मध्येच मध्य रेल्वेवर तिकीट न काढणाऱ्या आणि चुकीचं तिकीट काढून प्रवास करणाऱ्या 1.87 लाख घटना घडल्या. यातल्या दंडामधून रेल्वेला 9.11 कोटी रुपये मिळाले.
म्हणून या घटना येत आहेत समोर
मोबाईल तिकीट सेवा, एटीव्हीएम मशीन यासारख्या सुविधा असूनही प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं आहे. तसंच टीसी आता मोठ्या प्रमाणावर तिकीट चेक करत असल्यामुळे या घटना समोर येऊ लागल्याचंही रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.