नऊ गोळ्या लागूनही सीआरपीएफचा जवान बचावला
देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचं उदाहरण सारा देश पाहतो आहे. एक दोन नाही तर तब्बल नऊ गोळ्या लागूनही सीआरपीएफचे कमांडंट चेतन चिता सुखरुप बचावलेत.
नवी दिल्ली : देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचं उदाहरण सारा देश पाहतो आहे. एक दोन नाही तर तब्बल नऊ गोळ्या लागूनही सीआरपीएफचे कमांडंट चेतन चिता सुखरुप बचावलेत.
एखाद्या व्यक्तीचा प्राण जाण्यासाठी बंदुकीची एक गोळीही पुरेशी असते. मात्र नऊ गोळ्या लागल्यानंतरही चेतन चिता सुखरुप बचावलेत.
काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता जखमी झाले होते. त्यांच्या शरीरात नऊ गोळ्या घुसल्या होत्या. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांच्या डोक्यातही गोळी घुसली होती.
सांध्यांमध्ये फ्रॅक्चर होते. डोळ्याला मार लागला होता. महिन्याभरापासून ते कोमामध्ये होते.. मात्र आता ते शुद्धीवर आले असून डिस्चार्जसाठी फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हा एक प्रकारचा चमत्कारच असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर चेतन चिता मृत्यूवर मात करण्यात यशस्वी ठरल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.