13.5 हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्या शाहची चौकशी सुरू
१३ हजार ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारा गुजराती व्यावसायिक महेश शाह याची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाचे सहसंचालक विमल मीना यांनी ही माहिती दिली.
नवी दिल्ली : १३ हजार ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारा गुजराती व्यावसायिक महेश शाह याची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाचे सहसंचालक विमल मीना यांनी ही माहिती दिली.
महेश शाह साध्या अपार्टमेंटमध्ये राहणारा आणि ऑटोने कार्यालयात जाणारा. केंद्राच्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेअंतर्गत त्याने आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो गायब झाला होता. त्याला आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. आता तयांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेचं, त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याचीही माहिती विमल मीना दिली.
कोट्यवधींची संपत्ती घोषित करुन फरार झालेला महेश शाह काल माध्यमांसोर पुढे आला होता. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, कमिशनच्या लालसेपायी काही लोकांच्यावतीने आपण आयकर विभागाकडे आपले उत्पन्न घोषित केले होते. त्या सर्वच लोकांची नावे मी काही विशिष्ट आयकर अधिकाऱ्यांकडे उघड करीन असे त्यांने म्हटले होते.
शाह याने म्हटलेय, मी फरार झालेलो नाही; परंतु काही कारणांमुळे माध्यमांपासून दूर राहिलो, असेही तो म्हणाला. शाह याची मुलाखत सुरू असताना पोलीस आणि आयकर अधिकारी टी. व्ही. वाहिनीच्या कार्यालयात आले आणि त्यांनी शाह याला ताब्यात घेतले.
उत्पन्न प्रकटीकरण योजनेअंतर्गत मी ज्यांचा पैसा उघड केला, त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली, त्यामुळे मी कराचा पहिला हफ्ता भरू शकलो नाही, असे तो म्हणाला. मी लवकरच सर्व काही उघड करेन. ज्यांनी मला भरीला घातले ते लोक व्यावसायिक आणि राजकारणी असून, मी त्यांची नावे उघड असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता चौकशीत काय पुढे येते याकडे लक्ष लागले आहे.