बर्थडेमुळे या मंत्र्याची घरवापसी टळली!
समाधानकारक काम नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांना नारळ दिला. मात्र, एका मंत्र्यांना चक्क पाच दिवसांचा बोनस मिळाला. कारण होते त्यांचा वाढदिवस.
नवी दिल्ली : समाधानकारक काम नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांना नारळ दिला. मात्र, एका मंत्र्यांना चक्क पाच दिवसांचा बोनस मिळाला. कारण होते त्यांचा वाढदिवस.
केंद्रीय मंत्रिमंडळातून कर्नाटकमधील खासदार आणि अवजड उद्योग खात्याचे राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वर यांना डच्चू देण्यात आला. २०१४ मध्ये येडुरिअप्पा यांच्या अनुपस्थितीत लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी सिद्धेश्वर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यांचे काम समाधानकारक नव्हते.
या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर यांना ५ जुलै रोजी राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, नेमका याच दिवशी सिद्धेश्वर यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर यांच्या समर्थकांनी मतदारसंघात मोठ्या रॅलीचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राजीनाम्याच्या बातमीने कार्यकर्त्यांच्या या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी सिद्धेश्वर यांनी पक्ष अध्यक्ष अमित शहांना पत्र लिहीले. काही दिवसांचा अवधी देण्याची विनंती केली. वाढदिवस झाल्यानंतर चार-पाच दिवसांत मी स्वत:हून राजीनामा देईन. तोपर्यंत मंत्रिपदावर ठेवा, अशी विनंती त्यांनी केली होती.
सिद्धेश्वर यांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना अभय दिले. सिद्धेश्वर यांच्या जागी कर्नाटकातील रमेश जिगाजिनागी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय.