इस्लामाबाद :  भारतीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल 'पाकिस्तान झोपेचे सोंग घेत आहे' असे खडसावले होते. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाबाबत पाकिस्तान गंभीर नाही, असेही म्हटले होते. आता त्यांच्या विधानानंतर पाकिस्तानने या हल्ल्यासंदर्भात एफआयआर दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातील गुजरनवाला दहशतवादविरोधी पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३२४, १०९ आणि ७ATA अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही तक्रार सात 'अज्ञात व्यक्तीं'च्या नावे दाखल करण्यात आली आहे.


जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्याविरुद्ध सर्व पुरावे असूनही अज्ञात व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेल्याने पाकिस्तानच्या इराद्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. अजहर आणि दहशतवादी यांच्यातील टेलिफोन संभाषणाची रेकॉर्डिंग पाकिस्तानला देऊनही पाकिस्तानने एफआयआरमध्ये त्याचे नाव लिहिलेले नाही.


पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सहा जणांच्या तपास समितीची स्थापना केली होती. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या भूमीतील काही संघटना जबाबदार असल्याचा आरोप केल्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या समितीची स्थापना करण्यात आली होती.