पाटणा : कानपूरजवळ 20 नोव्हेंबर 2016ला झालेल्या रेल्वे अपघातामागे आयएसआयचा हात असल्याचं आता पुढे आले आहे. बिहार पोलिस आणि एटीएसनं केलेल्या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोतिहारी जिल्ह्यात हे तिघे जण सापडले असून त्यांचे नेपाळमधल्या आयएसआय ऑपरेटरशी संबंध असल्याचं चौकशीत पुढे आलंय. कानपूरप्रमाणेच बिहारमधल्या घाडासहन गावाजवळही घातपात घडवण्याचा या तिघांचा प्रयत्न होता. पण बिहार पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडलाय. 


कानपूरजवळ झालेल्या अपघातात पाटणा इंदोर एक्सप्रेसचे डबे रुळावरून उतरल्यानं 142 लोक मृत्यू मुखी पडले होते.  त्यानंतर काही दिवसातच उत्तरप्रदेशातच अजमेर-सियालदा एक्सप्रेसचेही डबे घसरले. पण त्यात मोठी जीवित हानी झाली नाही.  याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची कसून चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत.


कानपूरच्या अपघाताचा कट दुबईत रचण्यात आला होता. अटकेत असणाऱ्या तीन आरोपींपैकी एकानं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आरोपी मोती पासवान दिलेल्या माहितीनुसार दुबईत राहणारा अनिवासी नेपाळी नागरिक शमशुल होदा यानं कानपूरच्या घातपाताची सुपारी दिली. 


शमशुल होदा आयएसआयसाठी काम करतो. त्याचप्रमाणे त्याचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचंही मोतीनं कबुल केलंय.  कानपूरात घातपात करण्यासाठी मोतीला जुबेर आणि जियायुल या दोघांनी मदत केली होती. त्यांनाही दिल्लीतून अटक करण्यात आली.