पणजी : देशातील प्रसिद्ध परफ्यूम एक्स्पर्ट मोनिका घुरडे (38) यांची त्यांच्या गोव्यातील सनगोल्ड येथील राहत्या घरी हत्या करण्यात आली. मात्र, ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे, असे पोलिसांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनिका यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला. मोनिका यांच्या घरातील काही दागिने गायब झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मारेकर्‍यांनी चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. 


दरम्यान, मोनिका यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच घरगुती वादातूनही हत्या झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे. मात्र, पोलिसांकडून अधिकृत असे काहीही सांगण्यात आलेले नाही. हा खून कोणीतरी ओळखीच्या माणसाने केलेला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांच्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी रवाना झाल्या आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या हत्ये मागिल गूढ कायम आहे.


मोनिका मूळच्या नागपूरच्या होत्या. त्यांचे वडील मुंबईत न्यायाधीश होते. गोवा, चेन्नई तसेच लंडनमध्येही मोनिकाचा परफ्युम विकण्याचा व्यवसाय आहे. परफ्युमसंदर्भातील त्यांची लॅबोरेटरीही आहे. चेन्नईत त्यांची भारत राम अरोरतम (58) यांच्याशी 2004 मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला. दोघांतील वादातून ते वेगळे राहात होते. पती अरोरतम यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.