नवी दिल्ली : नोटाबंदीमुळं देशातली जनता हैराण, परेशान आहे... तर दुसरीकडं फरारी उद्योगपती विजय माल्ल्याचं 1200 कोटींचं कर्ज बुडीत खात्यात जमा करण्यात आलंय... हे असं का होतंय, पाहूयात हा रिपोर्ट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकां आणि एटीएमपुढं लागलेल्या या लांबच लांब रांगा... स्वतःच्या घामाचे पैसे बँकेत भरण्यासाठी आणि नव्या नोटा काढण्यासाठी हे लोक रात्रंदिवस रांगेत उभे आहेत. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 500 आणि 1 हजाराच्या नोटांवर केंद्र सरकारनं बंदी घातली. पण त्याचा फटका बसला तो सामान्य जनतेला... 


नोटाबंदीमुळं जनता त्रस्त असताना, बँकांनी मात्र कर्जबुडव्या उद्योगपतींवर 48 हजार कोटींची खैरात केली. एकट्या एसबीआयनंच 7 हजार कोटी रूपयांची कर्जं बुडीत खात्यात जमा केली. त्यात फरारी उद्योगपती विजय माल्ल्यांच्या 1200 कोटींच्या कर्जाचाही समावेश आहे. माल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांची सुटका आणि सामान्य जनतेला मात्र फटका बसत असल्यानं राष्ट्रवादीनं सरकारवर निशाणा साधलाय.


मात्र विजय माल्ल्यांचं करोडोंचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलं, याचा अर्थ या रकमेवर पाणी सोडलं असा नव्हे असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलाय.


मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा लाभ ठराविक उद्योगपतींनाच होणाराय, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. माल्ल्यांना कर्जमाफी मिळाल्यानं त्या आरोपाला पुष्टी मिळालीय.


खरं तर विजय माल्ल्यांचं कर्ज बुडीत खात्यात जमा होणं आणि नोटाबंदी यांचा तसा थेट संबंध नाहीय. पण सामान्य ग्राहकांचे हाल आणि माल्ल्यांसारख्या ग्राहकांना कर्जमाफी, या विरोधाभासाचं काय? माल्ल्यासारख्यांचं करोडोंचं कर्ज बुडीत खात्यात टाकणं म्हणजे पाच-दहा हजारांसाठी आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांच्या दुःखावर मीठ चोळण्यासारखं नाही का?